मुंबई / ऑआहे.नलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अनेक मोठमोठ्या नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली. नुकतीच शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.
शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे आभार मानले आहेत. यामध्ये शरद पवार त्यांच्या आवडीचे काम म्हणजे वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत.