भाजपला हटविण्यासाठी महाविकास आघाडीचा सल्ला : मात्र काँग्रेसला तृणमूल काँग्रेसशी कोणतेही संबंध नकोत
प्रतिनिधी /पणजी
तृणमूल काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी गोव्यासाठी दिल्याने विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जान आली आहे, मात्र काँग्रेसने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सर्व विरोधी पक्षांमध्ये एक विचार समान आहे व तो म्हणजे भाजपला सत्तेवरुन हटविण्यासाठी कोणताही त्याग शक्य आहे. यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी करण्याचा विरोधी पक्षांचा इरादा स्पष्ट झाला आहे.
गेले काही दिवस विरोधी पक्षातील फुटींमुळे मतविभाजनाचा लाभ सत्ताधारी भाजपला मिळेल आणि भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची भीती विरोधी पक्षांना झालेली असल्याने महाविकास आघाडी तयार करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले खरे तथापि काँग्रेस नेते राहुल गांधी हे विदेशात असल्याने हा आघाडीचा विषय प्रलंबित राहिला.
काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. तथापि, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत आम्ही काँग्रेस व तृणमूल या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले व गोव्यात महाविकास आघाडी स्थापन करु, असे सांगितले.
तृणमूल काँग्रेसकडून जोरदार स्वागत
पवार यांच्या निवेदनाचे तृणमूल काँग्रेस पक्षाने जोरदार स्वागत केले. पक्षाच्या खासदारांनी समाधान व्यक्त केले तसेच भाजपला सत्तेवरुन हटविण्यासाठी तृणमूल पक्ष कोणताही त्याग करण्यास राजी असल्याचे म्हटले आहे. तथापि, काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी मात्र महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही व शरद पवार यांनी कोणतेही निवेदन केलेले असेल तर शरद पवार यांना विचारा. आपण त्यावर कोणतेही भाष्य करु शकत नाही, असे सांगितले. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे व स्वागतही केले आहे.
काँग्रेसला तृणमूलशी संबंध नको
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस पक्षाशी कोणतेही संबंध प्रस्तापित करु इच्छित नाही. तृणमूलने काँग्रेसचे अनेक नेते पळविल्याने व काँग्रेस पक्षावरच वारंवार तृणमूल हल्ला करीत असल्याने तृणमूल वगळता इतर सर्व पक्षांशी आघाडी करण्यास काँग्रेस तयार असल्याचे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.
आघाडी करा अन्यथा पुन्हा भाजपची राजवट
दरम्यान, राज्यातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाला सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन करा, अन्यथा मतविभाजनाचा लाभ भाजप उठविणार व हा पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असा इशारा राज्यातील नागरिकांनी दिलेला आहे. त्याचबरोबर चर्चच्या फादर्सनीही दिलेला आहे. आपसातील मतभेद विसरुन एकत्र या, अन्यथा पुन्हा भाजप राजवाटीस सामोरे जा असा सल्ला एका वरिष्ठ ख्रिस्ती धार्मिक नेत्याने काँग्रेसला दिला आहे.