ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याचा चंग शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बांधला आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.
सन 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीला जोडण्याची महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार राष्ट्रपती व्हावेत, यासाठी राऊतांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांना संजय राऊत एकत्र करणार आहेत.
देशातील जनता भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही भाजपला विधानसभेत पराभव पत्करावा लागला. त्याचाच फायदा आता भाजपविरोधात असलेल्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे संजय राऊत भाजप विरोधातील पक्षांना एकत्र करणार आहेत.