ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.
पटेल म्हणाले, बरेच दिवस शरद पवार आणि राज्यपाल कोश्यारी यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे राज्यपालांनी पवारांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. या भेटीमागे कोणताही राजकीय विषय नव्हता. या भेटीत औपचारिक चर्चा झाल्या. कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली.
भाजप आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्षावर ही भेट असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, पवारांना अशा बाबतीत मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.