ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या दोन्ही शस्त्रक्रियामध्ये 7 दिवसांचा गॅप ठेवण्यात आला होता. त्यानंतरची ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.
दरम्यान, यापुर्वी शरद पवार यांना 29 मार्चला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 31 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर 12 एप्रिल रोजी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.