ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या, बुधवारी एंडोस्कोपी आणि सर्जरी होणार होती. मात्र, आज त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली.
शरद पवार यांच्या पोटात पुन्हा त्रास जाणवू लागला. पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना आजच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सोमवारी पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. मात्र आज अचानक त्रास सुरू झाल्याने पवार रुग्णालयात ऍडमिट झाले.