प्रतिनिधी / कराड :
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कराडचे सुपूत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी गुरूवारी 25 रोजी आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बुधवारी सकाळी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जितेंद्र पवार, सारंग पाटील, बाळासाहेब सोळस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
शरद पवार हे दरवर्षी 25 नोव्हेंबरला कराडला येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात. यावर्षी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी समाधीस्थळी भेट दिली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती.
समाधीस्थळावरून ते वेणूताई चव्हाण ट्रस्टच्या बैठकीसाठी रवाना झाले. तेथे ट्रस्टच्या बैठकीस उपस्थित लावून महाबळेश्वरला रवाना झाले. माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, नामदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवर यावेळी उपस्थित होते.