डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार
प्रतिनिधी/ मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती पवार यांनीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
कोरोना काळात शरद पवार यांनी सरकारच्या नियमांचे पालन करत राज्यात विविध ठिकाणी दौरे केले होते. गेले दोन दिवस पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. शरद पवार यांच्या परिवारात खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.
नियोजित कार्यक्रम रद्द
पवार यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, आता त्यांना कोरोना झाल्याने ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांकडून शरद पवारांची विचारपूस
शरद पवार यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबच चौकशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन शरद पवारांची चौकशी केली. शरद पवारांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे, असे शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.