पवार यांच्या हस्ते डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे उद्घाटन
-मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
प्रतिनिधी/कोल्हापूर
डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे उद्घाटन आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 28 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहेत.
तळसंदे येथील डी.वाय.पाटील एज्यूकेशनल सिटी येथे रविवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता शरद पवार यांच्या हस्ते कृषी व तंत्र विद्यापीठाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डी.वाय.पाटील, डी.वाय.पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता आदी उपस्थित राहणार आहेत.
पवारांच्या दौऱ्यात जिह्यातील राजकीय घडामोडींना येणार वेग
शरद पवार यांचा हा नियोजित दौरा असला तरी त्यामध्ये जिह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आगामी काळात गोकुळ, केडीसीसी या सहकारी संस्थांबरोबरच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे जिल्हा राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी पवार यांच्याकडून बेरजेचे राजकारण केले जाणार असल्याची चर्चा आहे.