प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरीमध्ये सातत्याने उत्कृष्ट काम करून लोकाभिमुख उपक्रम हाती घेणाऱया रोटे. शरद पै यांना रोटरी फौंडेशन इंटरनॅशनलतर्फे 2019-20 सालचे सर्वोत्कृष्ट रोटेरियन हे प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. रोटरीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा सन्मान बहाल करण्यात येतो. रोटरी इंटरनॅशनलमध्ये अत्युच्च पदावर असणाऱया व्यक्तींकडून एकमताने ही निवड केली जाते. याशिवाय रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे उत्कृष्ट रोटेरियन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. क्लबच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिकारग्रहण समारंभात क्लबचे मावळते अध्यक्ष रोटे. जीवन खटाव यांनी शरद पै यांना हा पुरस्कार प्रदान केला.
रोटे. शरद पै हे गेल्या 30 वर्षांपासून रोटरी क्लब बेळगावशी निगडीत आहेत. 2014-15 मध्ये त्यांनी क्लबचे अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. ते रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रशिक्षक आणि व्यवस्थापन अधिकारी होते. रोटरी इंटरनॅशनलने सध्या त्यांची रोटरी डिस्ट्रिक्टचे ग्रॅन्ट ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. रोटरीमध्ये सतत समाजाभिमुख काम केल्याबद्दल रोटरी फौंडेशन इंटरनॅशनलतर्फे हा सन्मान देण्यात येतो. यंदा शरद पै त्याचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे सलग दोन वर्षे शरद पै यांना फौंडेशनचा डिस्ट्रिक्ट सर्व्हिस पुरस्कारही मिळाला आहे. यापूर्वी रोटरी फौंडेशन इंटरनॅशनलतर्फे रोटे. व माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांना सर्व्हिस अबोव्ह सेल्फ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. शिवाय माजी प्रांतपाल कै. भाऊ नाईक व आनंद सराफ यांनासुद्धा रोटरी फौंडेशनने गौरविले होते.
क्लबला मिळालेल्या 1 कोटी रुपयांच्या जागतिक निधीतून एकस कंपनीच्या सहकार्याने 25 शाळांमध्ये स्वच्छतागृहे, हात धुण्याची सोय, बाक उभारणी तसेच वेगा हेल्मेटच्या सहकार्याने शहरातील 10 शाळांसाठी दुसऱया एका प्रकल्पांतर्गत 75 लाख रुपयांच्या निधीचा विनियोग करून शाळांचे रूप पालटणे, अशा अनेक मोठय़ा प्रकल्पांमध्ये शरद पै यांचा पुढाकार होता.
रोटरी क्लब बेळगावतर्फे पॉलिहैड्रॉन, अशोक आयर्न व अन्य मोठय़ा कंपन्यांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलला लवकरच व्हेंटीलेटर व कोरोनासह अन्य रोग तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शरद पै विशेष प्रयत्नशील आहेत. रोटरी अन्नोत्सव, किट वाटप, कोरोना साहाय्यता उपक्रम अशा सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. शिवाय क्लबला सातत्याने त्यांचे सहकार्य लाभत असते. या सर्व कार्याची नोंद घेऊन शरद पै यांना उत्कृष्ट रोटेरियन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरणप्रसंगी मावळते सचिव प्रमोद अगरवाल, नूतन अध्यक्ष डॉ. के. एम. केळुसकर, सचिव गणेश देशपांडे, मावळते उपप्रांतपाल वीरधवल उपाध्ये, नूतन उपप्रांतपाल डॉ. मनोज सुतार आदी उपस्थित होते.