वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारच्या राजकारणात बाजूला पडलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी रविवारी स्वतःचा पक्ष लोकतांत्रिक जनता दलाला लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात विलीन केले आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीतील स्वतःच्या निवासस्थानावर आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. व्यापक एकतेसाठी हे पहिले पाऊल आहे. देशभरातील स्थिती पाहता विरोधकांनी एकजूट होण्याची गरज आहे. आम्ही आमचा पुढाकार घेतला असल्याचे म्हणत शरद यादव यांनी तेजस्वी यादव हे बिहारचे भविष्य असल्याचे विधान केले आहे.
भाजपला कुठलाही एक पक्ष पराभूत करू शकत नाही. विरोधकांना एकजूट व्हावे लागणार आहे. लालूप्रसाद तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांच्याशी मिळून आम्ही राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करू, असे शरद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.