‘आरोग्यं धनसंपदा’ किंवा ‘शरीरमेव खलु धर्मसाधनम्’ अशा प्रकारची सुवचने आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. निरोगी शरीरातच निरोगी मन राहते. शरीरसंवर्धनाचे महत्त्व समर्थ रामदासांनीही सांगितले आहे. ‘लवकर निजे, लवकर उठे। त्यासी ज्ञान, आरोग्य, संपदा भेटे।’ अशी कितीतरी शरीर निरोगी ठेवण्यासंबंधीची सुवचने कानावर पडतात. लहानपणापासून मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लावल्या तर त्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपकारक ठरतात. कारण शरीर तंदुरुस्त असेल, तर माणसाचं मनही उत्साही, प्रसन्न, ताजे टवटवीत राहते. संस्कृतमध्ये शरीर कसे निरोगी राखावे, व्यायामाचे महत्त्व यासंबंधी अनेक श्लोक आहेत. सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत यावर प्रसारमाध्यमांद्वारे सतत प्रचार केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ही सुभाषिते चिंतनीय आहेत.
लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता।दोषक्षयोग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते।।
अर्थ-हलकेपणा, काम करण्याची शक्ती, स्थिरता, क्लेश सहन करण्याची शक्ती, रोगाचा नाश, जठराग्नी (भूक वाढणे) हे व्यायामाने निर्माण होते. शरीर कमावण्यासाठी व्यायाम आवश्यक. त्यामुळे शरीर चपळ बनते, काम करण्याची शक्ती येते, चरबी कमी होते, तसेच किरकोळ व्याधी व्यायामाने पळून जातात.
पवित्रं वृष्यमायुष्यं श्रमस्वेदमलापहम्।शरीरबलसंधानं स्नानमोजस्करं परम्।।
अर्थ-हे स्नान पवित्र, पौरुषत्व, आयुष्य वाढवणारे, श्रम व घाम आणि मळ दूर करणारे श्रे÷ साधन आहे. व्यायाम जितका महत्त्वाचा, तितकेच स्नानादी स्वच्छतेचे उपायही शरीर बलवान करण्यास उपयुक्त असतात. आपल्या देशात सर्वजण रोज स्नान करतात. खरंतर एका पुराणकथेत एकदा खा व तीनदा स्नान करा असा शिवशंकरांनी मानवांना आदेश दिला होता. तो देण्यासाठी नंदीला पाठवले होते. पण त्याने बरोबर उलट केले. तीनदा खा नि एकदा स्नान करा असे सांगितले. तेव्हा शंकरानी शाप दिला की, ‘माणसाला तीनदा खायला घालण्यासाठी तुला आपल्या मानेवर नांगराचे जू बाळगून शेत नांगरावे लागेल. त्यामुळे तू आता पृथ्वीलोकात जा.’ म्हणून बैलाच्या रूपात पाठीवर फटके सोसत तो नांगर ओढत बसला आहे. माणसं खादाड बनलेत आणि तीनदा स्नान करायचे विसरली. एकदाच करतात. असो. स्नानात दहा गुण आहेत. मन प्रसन्न करणे, वाईट स्वप्नांचा नाश, स्वच्छता राखणे, मळ दूर करणे, तेज वाढवणे, रूप खुलवणे, रोगनाश, कामाग्नी चेतवणे, थकवा दूर करणे, एखाद्याचे मन आकर्षित करणे इ. थोडक्मयात चांगल्या आरोग्यासाठी स्नान आवश्यक आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात मास्क वापरा, हात वारंवार धुवा यासारख्या सूचना रोग दूर ठेवण्यासाठीच दिल्या जातात. त्यांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. शरीरस्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. व्यायामही केला पाहिजे. करणार ना एवढे?
थोडे संस्कृत संभाषण
अतिथी आगमनम्।
आगच्छतु,उपविशतु।..या, बसा.
जलम् आनयामि?..पाणी आणू?
मास्तु/नैव..नको.
कथम् आगमनम् अभवत्?..कसं काय येणं केलंत?
मार्गः विस्मृतः किम्?..रस्ता चुकलात की काय?
चायं पिबति वा?..चहा घेणार का?