स्थुल लोकांमध्ये रोगाशी लढण्याची क्षमता कमजोर : लस अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता कमी
अमेरिकेत स्थुलत्वाच्या दर वाढण्यासह कोरोना विषाणूवरील नियंत्रणात त्याची गुंतागुंतीची भूमिका वैज्ञानिकांसमोर नवा प्रश्न उभा करणारी ठरली आहे. अध्ययनानुसार अधिक वजन असलेले लोक इतरांच्या तुलनेत आजाराच्या गंभीर हल्ल्याचे शिकार ठरू शकतात. माणूस आणि प्राण्यांच्या पेशींवर करण्यात आलेल्या प्रयोगातून अधिक चरबी कशाप्रकारे शरीराच्या इम्यून सिस्टीमला अस्तव्यस्त करू शकते हे समजले आहे.
स्थुलत्वामुळे रक्तदाब अन् मधुमेह
स्थुलत्व तसेच कोविड-19 यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे आणि गूढ स्वरुपाचे आहेत. अतिरक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक आजारांचा संबंध अधिक वजनाशी आहे. या आजारांनी प्रभावित व्यक्तींसाठी कोविड-19 शी लढणे तुलनेत अधिक आव्हानात्मक आहे. शरीरात चरबीचे अधिक प्रमाण फुफ्फुसांच्या खालील हिस्स्यांना दाबू शकते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो असे तज्ञ सांगतात.
वेगळा डोस द्यावा लागणार
30 वर्षीय अधिक वजन असलेल्या काही लोकांमध्ये आढळून आलेल्या इम्यून पेशी 80 वर्षीय लोकांसारख्या होत्या. या समस्येमुळे कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रभावात अंतर पडू शकते. स्थुल लोकांना लसीचा वेगळा प्रकारचा डोस द्यावा लागणार असल्याचे प्राध्यापक डॉ. बेक यांनी म्हटले आहे. स्थुल लोकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट आणि मृत्युमुखी पडण्याची शक्यता 50 टक्के अधिक असल्याचे म्हटले गेले आहे.