गोमंतक मराठा समाजातर्फे स्नेहमेळावा
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त गोमंतक मराठा समाजाने पणजीत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले असून त्यावेळी विविध पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर यांनी दिली.
रविवार 9 जानेवारी रोजी मराठा समाज राजाराम स्मृती सभागृहात सदर सोहळा सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत चालणार आहे. चेंबूर मुंबई येथील शिवसेना आमदार प्रकाश वैकुंठ फातर्पेकर या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे असतील तसेच प्रा. मनोज कामत (प्राचार्य मल्लिकार्जुन महाविद्यालय काणकोण) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. उद्योजक यतीन काकोडकर व कमलिनी पैंगिणकर यांची सन्माननीय उपस्थिती असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
कै. राजाराम पैंगिणकर यांच्या 1969 साली प्रकाशित झालेल्या मी कोण ? या पुस्तकाच्या तिसऱया आवृत्तीचे प्रकाशन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या सोहळय़ावेळी प्रा. पौर्णिमा राजेंद्र केरकर, डॉ. अनुपमा शिरीश बोरकर यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांतील बाकी राहिलेले गुणवत्ता पुरस्कारही प्रदान केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गोमंतक मराठा समाज हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. या समाजाने दिग्गज व्यक्तिमत्त्वे दिलीत. समाजाचे राजकारण करायला दिले जणार नाही, असे सांगताना गोव्यात सुमारे 70 हजार लोक या समाजाचे आहेत, पण राजकारण्यांना या समाजाचा स्वार्थासाठी वापर करू दिला जाणार नाही. त्यासाठी कुठल्याच राजकीय पक्षासोबत समाज नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताप्रमाणे राजकारण ठरत आहे. समाजकारणात हा समाज सदैव पुढे नेण्याचे आपले ध्येय असल्याचे आनंद वाघुर्मेकर यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मीकांत नाईक, मंगेश कुंडईकर, श्रीकृष्ण आजगावकर, नंदकिशोर शिरगावकर व उत्कर्षा बाणस्तारकर आदी मान्यवर उपस्थित होते.