एकजूट राहून द्रमुकशी लढण्याची अद्रमुकला सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारणातून निवृत्त झाल्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना त्यांनी केलेली ही घोषणा महत्वाची मानली जात आहे.
या घोषणेमुळे अण्णा द्रमुक पक्षाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शशिकला यांची नुकतीच बेंगळूरच्या कारागृहातून सुटका झाली आहे. त्या पुन्हा राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता होती. त्यामुळे अद्रमुक पक्षात मतभेदही निर्माण झाले होते. त्यांच्याशी जुळवून घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे भाजपने तसेच अद्रमुकच्या एका गटाने केली होती. तथापि, आता त्यांनीच निवृत्तीची घोषणा केल्याने, तसेच अद्रमुकच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने या पक्षासमोरचा पेचप्रसंग सुटला आहे, असे मानण्यात येते.
द्रमुकशी एकत्रितपणे लढा
अद्रमुक पक्षाने मतभेदांना थारा न देता द्रमुकसारख्या दुष्ट शक्तींशी लढा द्यावा. पक्षाच्या कार्यकर्त्यांना यासाठी मोठे कष्ट करावे लागतील. तथापि, त्यांनी धीरोदात्तपणे या निवडणुकीला सामोरे जावे. आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. अद्रमुकने पुन्हा सत्ता मिळवून जयललितांनी तामिळनाडूत निर्माण केलेला सुवर्णकाळ पुन्हा आणावा, असे आवाहन यांनी एका संदेशाद्वारे केले आहे.