प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले राष्ट्रवादीची मुलुख मैदान तोफ असलेल्या शशिकांत शिंदे यांचा कोरेगावातून निसटता विधानसभेला पराभव झाला होता. त्यांचा अर्ज भरायच्या दिवशीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी पाहून गुलाल उधळला होता. मात्र, त्यांच्या आमदारकीला ब्रेक लागला होता तो पुन्हा विधान परिषदेच्या रूपाने निघणार असून सोमवारी त्यांच्या उमेदवारीचा मुंबईत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, त्यांच्या उमेदवारीने जिह्यातील राष्ट्रवादीला नवं चैतन्य आणखी मिळणार आहे. मात्र, त्यांच्या आमदारकीमुळे सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना डोईजड होणार असून सेना विरुद्ध राष्ट्रवादी असे कोरेगाव विधानसभा मतदार संघात आगामी काळात चित्र निर्माण होण्याची शक्यता वतर्वतली जात आहे. जावलीचे सुपुत्र व माथाडी नेते शशिकांत शिंदे हे झुंझार नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते जाईल तेथे गर्दी आणि भाषण ऐकण्यास दर्दी लोकांची उपस्थिती असते.
वाशीपासून ते जावलीचे आमदार, जावलीपासून कोरेगावात आपले वलय उभे केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळताना त्यांनी जिह्यात संघटनात्मक बांधणी केली. 2019च्या या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जमेत असलेले सर्व आमदार निवडून आले फक्त शशिकांत शिंदे यांचा काही मतांनी पराभव झाला. मात्र, शशिकांत शिंदे हे कधीच कोरेगावच्या जनतेपासून दूर नव्हते. आमदारकी नसली तरी राज्याच्या राजकारणात त्यांचे वलय पक्के असल्याने कोरेगाव मतदार संघासह जिह्यात पुन्हा नव्याने त्यांनी कामाला सुरुवात केली. राष्ट्रवादी भवनात जनता दरबार सुरू केला. पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळाल्याने जमेची बाजू झाली. परंतु राष्ट्रवादीचा गड राखणारा ढाण्या वाघ हा आमदार असायलाच हवा असे पक्षाच्या वरिष्ठांना वाटले. अन विधानपरिषदेवर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
सोमवारी सकाळी मुंबईत त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार आहे. त्यामुळे जिह्यात कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले आहे.
सध्या सत्तेत महेश शिंदे असले तरी शशिकांत शिंदे यांनाही आमदारकी दिली गेल्याने सेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष पहायला मिळणार आहे. दोन्हीही आमदार दोघे ही तरुणांच्या गळ्यातले ताईत मानले जातात. त्यामुळे आता नेमके कोण कोणाला वरचढ ठरणार यामध्ये चुरस लागणार हे पहायला मिळणार हे नक्की.