मुंबई / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर शरद पवार यांची लाडकी लेक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर मात्र शरद पवार यांच्या फोटोची चर्चा आहे.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.
शरद पवार यांना वर्तमानपत्र वाचायला आवडतात, याविषयी अनेकदा सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. लॉकडाउनच्या काळात देखील शरद पवार यांनी तरूणांना वाचन करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी नेहमीप्रमाणे लवकर उठून वृत्तपत्राचे वाचन केले. त्यांच्या या इच्छाशक्तीचे नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.
शरद पवार यांच्या शस्त्रक्रियेवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित होते.