तोफगोळे, अग्निबाण डागले : आर्मेनिया
येरेवान
आर्मेनिया आणि अजरबैजान यांनी वादग्रस्त भाग नागोर्नो-काराबाखमध्ये परस्परांवर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप केला आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून दोन्ही देश नागोर्नो-काराबाख क्षेत्रात शस्त्रसंधी लागू करण्यास तयार झाले होते. अजरबैजानने शस्त्रसंधी लागू झाल्याच्या 4 मिनिटातच तोफगोळे आणि अग्निबाण डागल्याचा आरोप आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. अजरबैजानकडून तोफगोळे आणि अग्निबाण डागण्यात आले आहेत. अजरबैजानने रविवारी सकाळी नागोर्नो-काराबाखच्या दक्षिण भागात हल्ला केला आहे. या संघर्षात दोन्हीकडचे लोक मारले गेले आहेत, असा दावा आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या शुशन स्टीफन यांनी केला आहे. तर आर्मेनियाने देशातील 2 हजारांपेक्षा अधिक घरांना नुकसान पोहोचविल्याचा आरोप अजरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी केला आहे. मागील महिन्यापासूनच वादग्रस्त क्षेत्रावरून दोन्ही देशांमध्ये लढाई सुरू आहे. अनेक देश नागोर्नो-काराबाखला अजरबैजानचा हिस्सा मानतात. तर या भूभागावर आर्मेनियन लोकांचा कब्जा आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे आतापर्यंत 600 हून अधिक जण मारले गेले आहेत.