नवारस्ता / प्रतिनिधी
भावाला धारदार हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन घरी पाहुणी आलेल्या बहिणीच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांच्या सोन्याची चोरी केल्याची घटना पाटण तालुक्यातील नाडे गावात शुक्रवारी पहाटे घडली. दरम्यान, याच रात्री येथील आणखी एक बंद बंगला फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे एकाच रात्री सलग दोन घरफोडय़ा घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिसांत झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री रवींद्र बर्गे (रा. कोरेगाव) या आपल्या नाडे (ता. पाटण) येथील माहेरी भाऊ प्रमोद हणमंत पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी घराच्या पाठीमागील बाजूकडे असणाऱया दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी प्रमोद पाटील जागे झाले. मात्र पाटील यांच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून त्यांना चोरटय़ांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या गडबडीने प्रमोद पाटील यांची बहीण आतील दरवाजा उघडून बाहेर येताच चोरटय़ांनी बहीण जयश्री रवींद्र बर्गे यांच्या गळ्यातील सुमारे पावणे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पसार झाले.
यानंतर याच गावातील विकास महादेव कांबळे यांच्या बंद बंगल्याचे कुलूप फोडून चोरटय़ांनी कपाटे उचकटली, मात्र यामध्ये काहीही हाताला लागले नसल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथकाला पाचारण केले. यावेळी श्वानाने उसाच्या फडापर्यंत माग दाखवला. यावेळी एक शाल आणि जर्कीन पोलिसांच्या हाती लागले. यावेळी नाडे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार, पोलीस पाटील अण्णा पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.
पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी
मागील महिन्यात नवारस्ता परिसरात अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्रीत तब्बल चार दुकाने फोडली होती. या घटनेत काही जणांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारीही दिल्या होत्या, मात्र त्या चारही चोऱयांचा तपास अद्याप तपास सुरू असतानाच नाडे गावात सलग दोन घरफोडय़ा झाल्याने नाडे नवारस्ता परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाटण तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठेत पोलिसांनीही आता रात्र गस्त वाढवावी आणि चोरटय़ांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.