पुणे-बेंगलोर महामार्गावर मालखेड येथील घटना
वार्ताहर/कराड
मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गालगत सेवा रस्त्यावर पोकलेनवर झापलेल्या चालक व कामगाराला तीन अज्ञात इसमांनी चाकू व कोयत्याचा धाक धाकवून त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोकलेन चालक पारसनाथ आवघेशकुमार यादव (वय 28, रा. सोहरा, झारखंड) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसनाथ आवघेश कुमार यादव हे पोकलेन चालक आहेत. सध्या महामार्गालगत भारत गॅस पेट्रोलियमचे सीएनजी गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. गुरूवारी दिवसभर काम केल्यानंतर पारसनाथ आवघेशकुमार यादव व त्यांचा कामगार दिलीप कुमार हे मालखेड गावच्या हद्दीत महामार्गालगत सेवा रस्त्यावर पोकलेनवर झोपले होते. यावेळी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसम पोकलेनवर चढले. त्यांनी झोपलेल्या दोघांना उठवले.
चाकू व कोयत्याचा धाक दाखवून ओरडू नका, असा दम दिला. तसेच तुमच्याजवळ असलेले पैसे, मोबईल व दागिने द्या अशी मागणी केली. हातातील अंगठी दिली नाही तर बोट तोडून घेऊ, असे म्हणाले. यावर भीतीपोटी पारसनाथ आवघेशकुमार यादव व दिलीप कुमार यांनी त्यांच्याजवळील रोख रक्कम 8 हजार दोनशे रूपये, मोबाईल व सोन्याची अंगठी असा सुमारे 22 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल काढून त्यांच्याकडे दिला. तिन्ही इसम 25 ते 35 वयोगटातील होते. यादव यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.