ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील शहडोल मेडिकल कॉलेजमध्येशनिवारी रात्री उशिरा ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने आयसीयूमध्ये दाखल झालेल्या 12 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
रात्री उशिरा ऑक्सिजन दाब कमी होताच रुग्णांना त्रास होऊ लागला, त्यानंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. ऑक्सिजनचा प्रेशर वाढविण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थापनाने सिलेंडरकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत 12 रुग्णांनी आपला जीव गमावला होता. या 12 रुग्णांच्या मृत्यूपूर्वी या रुग्णालयात आणखी 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शनिवारी या मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात कोरोनाने 22 जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, शहडोल मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मिलिंद शिराळकर यांनीही ऑक्सिजनअभावी झालेल्या 12 मृत्यूंची पुष्टी केली आहे. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचे मान्य करण्यास शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.