बेंगळूरपाठोपाठ बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचनेसाठी शासनाकडून आदेश येण्याची चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर महापालिका वॉर्डरचना करण्याची सूचना नगरविकास खात्याने बजावली आहे. त्यामुळे बेळगावसह अन्य महानगरपालिकांच्या वॉर्ड पुनर्रचनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही वॉर्ड पुनर्रचना करण्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. मात्र बेंगळूर महानगरपालिकेची वॉर्डरचना करण्याची सूचना करण्यात आल्याने बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचनेचे काम लवकरच सुरू होईल, अशा चर्चेला उधाण आले आहे.
बेळगाव महापालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून दीड वर्ष झाले. मात्र, अद्याप निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक कधी होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना करून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, वॉर्ड पुनर्रचना व्यवस्थित झाली नसून शहरवासियांना अंधारात ठेवून वॉर्डची रचना करण्यात आल्याची तक्रार झाली होती. आरक्षणही रोटेशनप्रमाणे असल्याची तक्रार करून काही माजी नगरसेवकांनी धारवाड उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत वाद निर्माण झाला होता. बेंगळूर उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे सदर वॉर्डरचना व आरक्षण रद्द करून वॉर्ड पुनर्रचना करावी व आरक्षण जाहीर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दि. 26 सप्टेंबर 2019 रोजी बजावला होता. याबाबत राज्य शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही.
वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी नगरविकास खात्याकडून महापालिकेला पत्र पाठवून सूचना करण्याची गरज होती. पण वर्ष उलटले तरी नगरविकास खात्याकडून कोणताच आदेश देण्यात आला नसल्याने वॉर्ड पुनर्रचनेचे काम अद्याप रखडले आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाचा फैलाव वाढल्याने सरकारी कामकाज ठप्प झाले होते. अलीकडेच सरकारी कामकाजास प्रारंभ झाला असून विविध विभागांचे कामकाज सुरू झाले आहे. ग्रा. पं. निवडणुका घेण्याच्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालविली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिका निवडणूक लवकरच होईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे. वॉर्ड पुनर्रचना करून आरक्षण जाहीर झाल्यानंतरच महापालिका निवडणूक होऊ शकते. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्याच्या प्रक्रियेस किमान 3 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्मयता आहे. पण नगरविकास खात्याकडून याबाबत कोणताच अधिकृत आदेश जारी करण्यात आला नाही. अलीकडेच बेंगळूर महापालिका वॉर्डरचना करण्याची सूचना नगरविकास खात्याने बजावली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बेंगळूरपाठोपाठ बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचनेसाठी शासनाकडून आदेश काढण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे शहरवासियांचे लक्ष नगरविकास खात्याच्या आदेशाकडे लागले आहे.