सध्या शहराची लोकसंख्या साडेसात लाख
शहरातील कचरा वाढला पण कर्मचारी संख्या अपुरी
नंदकुमार तेली / कोल्हापूर
शहरासह उपनगरामध्ये मोठया प्रमाणात नागरिकरण झाले असून लोकसंख्या सुमारे साडेसात लाखांवर पोहोचली आहे. तसेच कचरा निर्माण होण्याचे प्रमाण वाढून कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. तरीही कर्मचारी संख्येत वाढ न होता तेवढीच राहिली आहे. यामुळे सध्या सुमारे 2 हजार 50 कर्मचाऱ्यांवर कोल्हापूरचे आरोग्य अवलंबून असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी झाली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेल्टर सामाजिक संस्थेमार्फत सुमारे 4 हजार लोकांना मनपाने शौचालये बांधून दिली आहेत. यामध्ये राजेंद्रनगर, बोंद्रेनगर, कनाननगर, विचारे माळ, सदर बाजार आदी झोपडपट्टींचा समावेश आहे. ड्रेनेज विभागात 250 कामगार कार्यरत असून यापैकी 70 कामगार संपूर्ण शहरातील व उपनगरातील काही ठिकाणी असलेल्या ड्रेनेजची तर 180 कर्मचारी सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुतारी आदींची स्वच्छता राखण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. आरोग्य अधिकारी ए.एम.पोळ, मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन सकाळी 6 ते 2 व दुपारी 2 ते रात्री 10 अशा दोन शिफटमध्ये कर्मचारी काम करतात.
कचरा वाढला तरी कर्मचारी संख्या तेवढीच
1972 साली नगरपालिका असताना आरोग्य विभागात कर्मचारी भरती करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. तेव्हाच्या नियोजनाऐवढेच कर्मचारी सध्याच्या महानगरपालिका विभागात कार्यरत आहेत. यामुळे संपूर्ण शहरासह उपनगराची स्वच्छता राखण्यासाठी त्यांची दमछाक होते. लोकसंख्येच्या वाढीबरोबर कचरा वाढला, क्षेत्र वाढल्याने आता कर्मचारी संख्येतही वाढ होणे गरजेचे आहे.
1496 कायम तर 303 रोजंदारी झाडू कामगार
सध्या आरोग्य विभागात सुमारे 1496 झाडू कामगार कायम तर 303 रोजंदारीवर आहेत. ते गटर साफ करणे, रस्त्यांवरील झाड-लोट करणे, नाले-चॅनल सफाई करणे, ओला व सुका वर्गीकरण घन कचरा गोळा करणे, कचरा कोंडाळयातून कचरा उठाव करणे, हा कचरा ट्रकमधून झुम प्रकल्पा येथे नेणे, औषध व धुर फवारणी, स्मशानभूमी येथे सेवा देणे आदी कामे करतात. आणखी 250 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
जीव धोक्यात घालून स्वच्छतेची कामे
ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना मैला उपसा करण्यासह व्हॅक्युम मशिनव्दारे सेफटी टँक उपसा करणे आदी कामे करावी लागतात. सध्या कोरोना (कोविड19) संसर्गाचा फैलाव मोठया प्रमाणात झाला असतानाही आपला जीव धोक्यात घालून ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची कामे केली आहेत.