प्रतिनिधी/ बेळगाव
हिडलक जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली असून, दुरूस्तीसाठी दि. 26 व 27 रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी शहराच्या उत्तर भागात दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात शहरवासीयांना पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
राकसकोप आणि हिडकल जलाशयामधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र हिडकल जलाशयामधून पाणी उपसा करण्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. हिडकल जलाशयामधून शहराला सध्या 12 एमजीडी पाणीपुरवठा केला जातो. ही क्षमता वाढवून दररोज 18 एमजीडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. याकरिता पंप जोडणीचे काम सुरू आहे. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी हिडकल जलाशयाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हिडकल जलाशयामधून मिळणारे पाणी शहराच्या उत्तर भागात पुरविण्यात येते. पण पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उत्तर भारात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.