गळती निवारणासाठी पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी /बेळगाव
हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला कणबर्गीनजीक गळती लागल्याने गुरुवार दि. 16 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी दि. 17 रोजी शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे.
हिडकल जलाशय ते बसवनकोळ यादरम्यान असलेल्या जलवाहिनीला कणबर्गीनजीक गळती लागली आहे. यापूर्वीही तीनवेळा जलवाहिनीची दुरुस्ती केली होती. पण हे काम व्यवस्थित झाले नसल्याने पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती एल ऍण्ड टी कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीमुळे दि. 16 रोजी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. अशातच आता यामध्ये एक दिवस वाढल्याने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस चोवीस तास पाणी योजनेसह विविध भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय येणार आहे. राकसकोप जलाशयामधून पाणी विविध भागात पुरविले जाणार आहे.