प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवार दि. 6 व गुरुवार दि. 7 रोजी हिंडलगा पंपिंग हाऊसचा विद्युतपुरवठा बंद राहणार आहे. 600 अश्वशक्तीचे विद्युतपंप बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीसाठी विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पंपिंग स्टेशनमधून जलशुद्धीकरण केंद्राला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दि. 6 आणि 7 रोजी 24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटीच्यावतीने करण्यात आले आहे.