अँटिजेंन चाचणीस नकार: नागरिक संतप्त : मोठा पोलीस बंदोबस्त
सांगली / प्रतिनिधी
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनलेल्या शहरातील इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी शनिवारी कंटेन्मेंट झोनची प्रचंड तोडफोड केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वादावादी करत कंटेन्मेंट झोनला विरोध केला. परिसरातील नागरिकांनी अँटिजेंन चाचणी करण्यासही नकार दिला. यामुळे इंदिरानगरमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, नगरसेवक अभिजित भोसले यांनी घटनास्थळी भेट देत संतप्त नागरिकांना शांततेचे आवाहन केले. नागरिकांच्या सूचनांनुसार पाहणी करून कंटेन्मेंट झोनच्या पतीसारबाबत निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर तणाव निवळला आहे. शहरातील इंदिरानगर मध्ये कोरोना बाधित २५ रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी अँटिजेंन चाचणी मध्येच २३ रुग्ण सापडले. त्यामुळे हा परिसर शुक्रवारी रात्री सील करण्यात आला होता.
शनिवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी कंटेन्मेंट झोन मध्ये पत्रे मारण्यास सुरवात केली. संतप्त झालेल्या नागरिकांनी याला मज्जाव केला. त्यामुळे वादास सुरवात झाली. संतप्त झालेल्या नागरिकांनी झोनची तोडफोड केली. पत्रे उपसून टाकले. याशिवाय अँटिजेंन चाचणीस नकार दिला. दरम्यान संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेत रुग्ण सापडलेल्या गल्लीपुरताच कंटेन्मेंट झोन करण्यात येत आहेत. त्यामुळे दुपारी तणाव निवळला.