उद्यमबाग, वडगाव, शहापूर, अनगोळ, टिळकवाडी, खासबागमध्ये शुकशुकाट
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरासोबतच उपनगरांमध्ये शनिवारी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये सहभाग घेतला. त्यामुळेच रस्त्यांवर शुकशुकाट व निरव शांतता पाहायला मिळाली. उद्यमबाग, वडगाव, अनगोळ, शहापूर, टिळकवाडी, खासबाग या परिसरात सकाळपासून शांतता होती. मेडिकल, हॉस्पिटल व दूध यासाठीच नागरिक बाहेर पडताना दिसत होते. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उपनगरांमध्ये मेडिकल, हॉस्पिटल व दुधाची विक्री सुरू ठेवण्यात आली होती. इतर व्यवसाय ठप्प असल्याने शुकशुकाट होता. नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्यामुळे पोलीसही रिलॅक्स दिसून आले.
शहापूरमध्ये रस्ते निर्मनुष्य
शहापूरचा खडेबाजार परिसर नेहमी गर्दीने फुललेला असतो. परंतु शनिवारी लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता होती. सर्व व्यवहार बंद असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. नाथ पै चौक व बँक ऑफ इंडिया कार्नर येथे पोलिसांकडून ये-जा करणाऱयांची चौकशी करण्यात येत होती. सकाळच्या सत्रात दूध खरेदीची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर मात्र पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळाला.
अनगोळ-वडगावमधील नागरिक शिवारात
वडगाव-अनगोळ परिसरात अनेक शेतकरी कुटुंबे आहेत. त्यामुळे जनावरांना चारा आणण्यासाठी, शेतामध्ये शेणखत पसरण्यासाठी, बांध घालण्यासाठी शिवारांमध्ये शेतकरी दिसून येत होते. लॉकडाऊन असल्याने शेतातील कामे उरकून घेण्यासाठीची लगबग सुरू होती. त्यामुळे दिवसभर बाजार गल्ली, वडगाव मुख्य रस्ता, नाझर कॅम्प, पाटील गल्ली, येळ्ळूर रोड, कारभार गल्ली या भागात शुकशुकाट होता. अनगोळ नाका व धर्मवीर संभाजी चौक येथे रस्ता बंद करण्यात आला होता.
टिळकवाडीत नागरिक घरांमध्ये
कोरोनाचा धोका वाढत असल्याने टिळकवाडी तसेच परिसरातील नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे रस्त्यांवरील वर्दळ पूर्णपणे थांबलेली दिसली. काही ठिकाणी निराधारांना अन्न देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य धडपडत होते. आरपीडी चौक, दुसरे रेल्वेगेट येथे पोलिसांकडून वाहनचालकांची चौकशी करण्यात येत होती.
उद्यमबागमधील यंत्रांची धडधड थांबली
बेळगावचे औद्योगिक नगर म्हणून ओळखल्या जाणाऱया उद्यमबाग येथील यंत्रांची धडधड शनिवारी लॉकडाऊनमुळे थांबली. यामुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर शांतता होती. वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद असल्याने निरव शांतता पाहायला मिळत होती. खानापूर रोडमार्गे येणाऱयांना मजगाव क्रॉस, बेम्को क्रॉस तसेच फौंड्री क्लस्टर चौक येथे पोलिसांकडून विचापूस करूनच वाहनांना प्रवेश देण्यात येत होता.
खासबाग-जुने बेळगावमध्ये यंत्रमागांची खटखट
खासबास-जुने बेळगावचा परिसर हा यंत्रमागांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येकांच्या घरात यंत्रमाग आहेत. शनिवारी लॉकडाऊन असल्याने मोठे यंत्रमाग कामगारांविना बंद ठेवण्यात आले होते. परंतु घरांमध्ये यंत्रमाग असणाऱयांनी ते सुरूच ठेवले होते. त्यामुळे रस्त्यांवर जरी शांतता असली तरी यंत्रमागांची खटखट मात्र ऐकू येत होती.