प्रतिनिधी / बेळगाव
जनतेला कोरोना काळातही वेळेत दूध उपलब्ध व्हावे, याकरिता शहरातील नंदिनी आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सरकारने दूध विक्रीसंबंधी स्वतंत्र मार्गसूची जारी केली असून कर्नाटक दूध संघाच्या नंदिनी दूध विक्रीची आस्थापने सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने बाजारपेठेवर मर्यादा आणल्या आहेत. शिवाय बाजारपेठेची वेळ सकाळी 6 ते 12 अशी केली आहे. जनतेला दिवसभर नंदिनी दूध खरेदी करता येणार आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी गेल्या मंगळवारी रात्रीपासून राज्यात 14 दिवसांचा क्लोजडाऊन जारी करण्यात आला. मात्र, सरकारने केएमएफची नंदिनी आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी शहरातील नंदिनी आस्थापने सुरू होती. दुधाची विक्री करणारी नंदिनी आस्थापने सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना शुद्ध दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी आस्थापने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
शहरात महांतेशनगर, कणबर्गी रोड, केळकर बाग यासह 85 ठिकाणी नंदिनीची आस्थापने दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहेत. ही सर्व आस्थापने दिवसभर खुली ठेवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या काळातही नंदिनी दूध मिळणार आहे.