पोलादपूर-सुरुर राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रस्ताव द्यावा
प्रतिनिधी/ सातारा
पोलादपूर- महाबळेश्वर-पांचगणी-वाई-सुरुर हा सध्याचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करुन जाहिर होणेबाबतचा प्रस्ताव दयावा. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास त्याचे जमिन हस्तांतरणाची रक्कम आणि अनुषंगीकबाबींची सोडवणुक करण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करु अशी सूचना करतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शेंद्रे ते कागल सहापदरीकरण, पुणे-सातारा, खंबाटकी बोगदा, कराड आणि सातारा शहरातील फलायओव्हरचे सुशोभिकरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणामार्फत सुरु असलेल्या विविध कामांची आढावा बैठक आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहामध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
पुणे ते सातारा या रस्त्याचे काम सन 2013 साली पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि आज 2022 सुरु होवून दोन महिने उलटत आले तरी सुध्दा अद्यापि या रस्त्यावरील पुलांची, सेवा रस्त्यांची आणि विविध छोटी-मोठी कामे अपूर्ण आहेत. मंदगतीने काम होत असल्यास, त्याचा फटका अधिका-यांना नाही तर सामान्य लोकांना बसतो याचे भान प्राधिकारणाच्या संबंधीत अधिका-यांनी ठेवले पाहीजे.
तीच अवस्था खंबाटकी घाटातील नविन बोगदयाची आहे. केंद्राकडून निधीची कोणतीही कमतरता नसतानाही आजमितीस फक्त 24 ते 25 टक्के काम झाले आहे. अश्या गतीने काम पूर्ण होण्याला किती वेळ लागेल याची जाणिव ठेकेदारांना आहे का असा संतप्त सवाल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला.
सातारा आणि कराड शहराजवळुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरब्रिज बांधले आहेत त्या खालील जागेचा सुयोग्य विकास होणे आवश्यक आहे. नाहीतर गलिच्छपणा आणि अतिक्रमणांची भर याठिकाणी पडणार आहे. त्यामुळे ओव्हरब्रिजच्या खालील जागांचे सुशोभिकरण करणेची कार्यवाही करावी. याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने पोलिस चौकी, गार्डन, पार्किग, छोटेखानी भाजीमंडई, व्हर्टिकल गार्डनिंग आदी उपयुक्त योजना राबविणेबाबतही खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.
पोलादपूर ते सुरुर हा राज्यमार्गावर प्रचंड वाहतुक असते. तसेच या मार्गावर अपघात देखिल वारंवार झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तथापि हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे वर्ग झाल्यास, रस्ता रुंदीकरणासंबंधातील जमिन हस्तांतरण प्रक्रीया, तसेच अनुषंगी बाबी याकरीता केंद्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन घेतला जाईल. पंतप्रधान नेरेंद्र मोदी आणि मंत्री नितिन गडकरी यांचेकडे आपण जरुर तो पाठपुरावा करु असे देखिल यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचवले.
बैठकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचवलेल्या बाबींवर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिकारी यांनी मान्य केले.
बैठकीस शेंद्रे-कागल महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री.कंधारकर, पुणे सातारा महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री.कदम, आणि राष्ट्रीय महामार्ग संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प संचालक श्री.देशपांडे यांचेसह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.