नागरिकांनी सदर वाहनचालकास अडवून धारेवर धरले : खासगी सेफ्टिक टँक वाहनधारकांवर कारवाईची स्थानिकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सेफ्टिक टँक पूर्ण तुंबल्यास स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, टाकीमधील मैला डेनेज चेंबरमध्ये सोडला जातो. पण सेफ्टिक टँक स्वच्छ करणाऱया एका खासगी वाहनधारकाने शहरातील मैला शाहूनगर येथील शेतवडीत सोडल्याने नागरिकांनी सदर वाहनचालकास अडवून धारेवर धरले. पण महापालिकेचे वाहन असल्याचे सांगून उद्धट उत्तरे देऊन त्याने काढता पाय घेतला.
सेफ्टिक टँक स्वच्छ करण्याचे काम काही खासगी वाहनधारकही करीत आहेत. मात्र, महापालिकेचे असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रकारही सुरू आहे. सोमवारी शाहूनगर परिसरातील नाल्यामध्ये मैलायुक्त सांडपाणी सोडताना सेफ्टिक टँक वाहन आढळून आले. सदर वाहनचालकाकडे विचारणा केली असता उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी वाहनचालकाला अडवून धारेवर धरले. यापुढे पुन्हा या ठिकाणी शहरातील मैला सोडल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. 15 दिवसांपूर्वी सदर वाहनचालकाने वाहनामधील मैलायुक्त सांडपाणी शाहूनगर येथील नाल्यामध्ये सोडले होते. त्यावेळीदेखील वाहनचालकाला समज देण्यात आली होती. पण नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून वारंवार सांडपाणी सोडण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे सोमवारी सदर वाहनचालकाला शेतकऱयांनी रंगेहाथ पकडून धारेवर धरले. वाहनाचे छायाचित्र व माहिती देऊन महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली. सदर वाहन महापालिकेचे असल्याचे समजून नागरिकांनी कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, वाहनचालकाला समज देऊन सोडण्यात आले. पण सदर वाहनचालकाने शेतकऱयांना उद्धट उत्तरे देऊन तेथून काढता पाय घेतला. खासगी वाहनांद्वारे शहरातील मैलायुक्त सांडपाणी शहरातील नाल्यांमध्ये सोडण्याचा प्रकार सुरू आहे.
खासगी सेफ्टिक टँक वाहनधारकांवर कारवाई करा
सेफ्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी शहर परिसराकरिता 1500 रुपये शुल्क आकारणी करण्यात येते. शहराबाहेर असल्यास 2500 रुपये घेण्यात येतात. पण सेफ्टिक टँकमधील सांडपाणी योग्य ठिकाणी सोडणे वाहनचालकाची जबाबदारी असते. शहरात महापालिकेच्यावतीने सेफ्टिक टँक स्वच्छ करण्यात येतात. पण सदर सांडपाणी डेनेज चेंबरमध्ये सोडण्यात येते. पण खासगी वाहनचालक जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी नाल्यामध्ये सांडपाणी सोडत असल्याने परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासगी सेफ्टिक टँक वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यावेळी परिसरातील रहिवाशांसह राजू चव्हाण, शंकर कोनेरी व सचिन पाटील आदी उपस्थित होते.
या प्रकाराबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे चौकशी केली असता सदर वाहन खासगी असल्याचे निदर्शनास आले आहे. अयोग्य पद्धतीने मैला सोडत असल्याबद्दल नोटीस बजावून सदर वाहन जप्त करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांना करण्यात आल्याची माहिती डॉ. डुमगोळ यांनी दिली.