नियमित कचरा संकलनासाठी महापालिकेचे नियोजन, रात्रीच्यावेळीही आता कचरा संकलित होणार
प्रतिनिधी/ कोल्हापूर
प्रभागातील कचरा पूर्ण क्षमतेने उठावासाठी महापालिकेने दोन सत्रात संकलनाचे नियोजन केले आहे. यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 वाजता ऍटो टिपरद्वारे कचरा संकलन होणार आहे. प्रत्येक प्रभागातील सर्व एरिया कव्हर करणे हा यामागील उद्देश आहे.
शहरामध्ये रोज निर्माण होणारा कचरा संकलनासाठी 104 ऍटो टिपर आहेत. सध्या या टिपरद्वारे सकाळी 6 ते दुपारी 2 वाजे पर्यंत कचरा संकलन करण्यात येतो. काही प्रभागामध्ये 2 ऍटो टिपर वाहनांद्वारे पूर्ण क्षमतेने कचरा संकलन करण्यात येत आहे. तर काही प्रभागामध्ये एकच टिपर असल्यामुळे घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. घंटागाडीद्वारे संकलन करण्यात येणारा कचरा कंटेनरमध्ये टाकण्यात येतो. सद्यस्थितीमध्ये बरेच कचरा कंटेनर खराब झालेले आहेत. तसेच आर.सी. वाहनेही वारंवार नादुरुस्त होत आहेत. प्रभागात काही भागात रोज टिपर पोहोचू शकत नाही. त्यामुळे मागील काही दिवसापासून शहरात कचरा उठावाची समस्या निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता आणि दुपारी 2 ते रात्री 10 वाजता अशा दोन सत्रात टिपरद्वारे कचरा संकलन होणार आहे. सकाळ सत्रात के.एम.टीकडील 50 वाहनचालक या गाडीवर उपलब्ध करण्यात आले आहेत. रोज पूर्ण क्षमतेने घराघरातून कचरा संकलन केल्यास कंटेनरमध्ये नागरिकांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
टिपर संपूर्ण एरिया कव्हर करणार
सध्या टिपर प्रभागातील काही परिसरात रोज पोहोचू शकत नाही. सकाळी सत्रात निम्म्या प्रभागात तर दुपारच्या सत्रात उर्वरीत प्रभागात अशा दोन सत्रात कचरा उठाव होणार असल्याने संपूर्ण एरिया कव्हर होणार आहे. रात्रीही टिपर कचरा उठावाचे काम करणार आहेत.
लवकरच आणखीन 65 टिपर येणार
महापालिकेच्यावतीने नवीन 65 ऍटो टिपर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळ सत्रामध्ये सर्व प्रभागामध्ये नियमितपणे ऍटो टिपर वाहने उपलब्ध होणार आहेत. ऍटो टिपरद्वारे 100 टक्के कचरा संकलन सुरु झाल्यानंतर शहरातील उर्वरीत सर्व कंटेनर काढण्याचे नियोजन आहे.
घंटागाडी आली नसल्यास या क्रमांकवर संपर्क साधा
ऍटो टिपर वाहन उपलब्ध न झाल्यास किंवा कचऱयासंबंधी काही तक्रार असल्यास ए,बी,सी,डी वॉर्डमधील नागरिकांनी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर (9766532040), तर ई वॉर्डसाठी निखिल पाडळकर (9766532038) व आरोग्य विभाग 0231-2540290 वर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
चार प्रभागात ट्रायल
महापालिकेच्यावतीने गुरूवारी चार प्रभागात सकाळ व रात्री अशा दोन सत्रात कचरा उठाव करण्यात आला. आज, शुक्रवारपासून संपूर्ण शहरात अशा पद्धतीने कचरा उठाव होणार असल्याची माहित विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर यांनी दिली.