भावी नगरसेवक म्हणून अनेकजण लागले मिरवू
प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्या निवडणूकीबाबत कधी नगारे वाजताहेत याकडेच सगळय़ा इच्छूकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दोन्ही आघाडीच्या नेत्यांच्यापुढे विद्यमान नगरसेविकांचे पतींची लुडबुड वाढली गेली आहे. आपल्याला नाहीतर आपल्या सौसाठी तरी तिकीट फायनल झाले अशीच आवई हे प्रभागात उठवून फिरत आहेत. काही इच्छूकांनी आपणच मेहरबान म्हणून घाई सुरु केली आहे. काही इच्छूकांनी तर आपले कार्यालय, सोशल मीडियावर केलेल्या सामाजिक कार्याची प्रसिद्धी सुरु केल्याने इच्छूकांची शहरात नुसतीच घाई सुरु झाली असून अद्याप प्रशासनाकडून प्रभाग रचना सुद्धा जाहीर केलेली नाही. त्यामुळे सगळयांच्या नजरा प्रशासनाच्या हालचालीकडे आहेत.
सातारा शहरात सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी या दोन्ही राजेंच्या आघाडय़ामध्ये अनेकजण इच्छूक आहेत. इच्छूकांनी आपल्या आपल्या वॉर्डात लसीकरण मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, अगदी प्रभाग सोडून काहींनी साहित्य वाटप करुन आपणच जनतेसाठी किती करतो हे दाखवण्याची धडपड सुरु आहे. तर काही विद्यमान नगरसेविकांच्या पतीराजांचे पुन्हा पालिकेत आपल्या सौ किंवा आपण तयार आहोत हे दाखवण्यासाठी प्रभागात हळदी कुंकू, संक्रातीला वाण वाटपाचे कार्यक्रम घेवून दाखवून देत आहेत. तसेच नेत्यांच्यासोबत फिरुन नेत्यांनी आपले तिकीट फायनल केले आहे. आपला वॉर्ड आपल्यासाठी चांगला आहे. आम्हाला विरोधकच कोण नाही असे वातावरण सध्या आहे अशी चर्चा इच्छूकांकडून शहरात केली जात आहे. दरम्यान, काही इच्छूकांनी तर आपले संपर्क कार्यालय वॉर्डात सुरु केले आहे. त्या कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. काही इच्छूकांनी तर लोकांची कामे आपण कशी मार्गी लावतो हे दाखवून देण्यासाठी प्रभागात नागरिकांशी संपर्क वाढवला गेला आहे. त्यामध्ये अद्यापही प्रशासनाकडून साधी वॉर्ड रचनाही जाहीर झालेली नाही. ती कधी जाहीर होईल. ओबीसी आरक्षण कसे पडेल याचीच चर्चा सध्या रंगत आहे.
दोन्ही नेत्यांच्यापुढे नुसतीच मिरवामिरवी
खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे या दोन्ही नेत्यांच्यापुढे सध्या अनेक इच्छूकांची नुसतीच मिरवामिरवी सुरु आहे. परंतु निवडणूक जाहीर होईल तेव्हा हे मिरवणारे कार्यकर्ते मागे पडतात अन् ज्यांना तिकीट द्यायची ते पुढे येतात, अशीही एका बाजुला चर्चा सुरु आहे.