वार्ताहर/ कराड
कराड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत डेंग्यू, मलेरिया व चिकुन गुणिया आजाराच्या रूग्णांत वाढ झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात फॉगिंग मशिनने धूर फवारणी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कराड शहरासह तालुक्यात अतिवृष्टी व महापुराचे संकट ओढावले होते. महापूर ओसरल्यानंतर मात्र शहरासह तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व चिकुन गुणियासदृश्य आजाराच्या रूग्णांत वाढ झाल्याचे समोर येत आहे. याबाबत तालुका आरोग्य विभागाच्या वतीने गावोगावी सर्व्हेचे काम सुरू केले असून स्थानिक ग्रामपंचायतींना डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कराड शहरातही डेंग्यू, मलेरिया व चिकुन गुणियाचे रूग्ण आढळत असल्याने नगरपालिकेनेही उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात फॉगिंग मशिनच्या साहाय्याने औषध फवारणी सुरू केली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.