वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील पोवईनाका, मनाली कॉर्नर या मार्गावरील फळविक्रेत्यांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. रस्त्यालगत हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते. यामुळे त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू असून जनजीवन पुन्हा पर्ववत करण्यात येत आहे. खरेदीचे विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू झाल्याने शहरातील फळविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करायला सुरूवात केली आहे. जागा दिसेल तिथे हातगाडे उभे करून विक्री करण्यात येत आहे. एसटी स्टॅड परिसरात सेव्हन स्टॉर मॉल समोर हातागाडय़ाच्या रांगा लागल्या आहेत. तर ग्रेड सेपरेटरच्या लगत हेम होन्डा येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यांच्यावर पालिकेच्या कारवाईचा कोणताच परिणाम होत नसल्याने ही कारवाई वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. शनिवारी पोवईनाका येथील प्रकाश मेडीकल जवळ फळविक्रेता हातगाडा लावून उभा होता. यामुळे पार्किगला व प्रवासातील इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होत होता. या विक्रेत्याला सूचना करूनही त्याने वाहतूक पोलिसांकडे दुर्लक्ष केले. तसेच हातगाडा हटवला नाही. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
मोनार्क कॉर्नर येथेही रस्ता अरूंद आहे. या रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते दिवसभर बसलेले असतात. या ठिकाणी ग्राहकांची संख्या जास्त असल्याने फळविक्रेत्यांनी या रस्त्यालगत थाट मांडले होते. वारंवार सूचना करूनही वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष न देता विक्री सुरूच ठेवली होती. यामुळे या ठिकाणीही शनिवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तीन फळविक्रेत्यावर कारवाई केली. या चारही विक्रेत्यांवर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपालिका सुट देते का…
लॉकडाऊनमध्ये रस्ते ओस पडले होते. मात्र अनलॉक सुरू होताच पुन्हा अतिक्रमणाने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. साताऱयातील रस्त्यावरचा अतिक्रमण ाचा प्रश्न अनेक वर्षापासूनचा आहे. मात्र यावर नगरपालिकेच्या पोकळ कारवाया कोणताच प्रभाव टाकत नाहीत. दोन दिवसापुढे अतिक्रमण मोहीम थंड पडते. आणि पुन्हा जै से थे अशीच परिस्थिती निर्माण होते. यांचा फायदा या विक्रेत्यांनी घेतला आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांना नगरपालिकेचे काम करावे लागत आहे. फाळकुटदादांमुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहेत. परंतु पालिका मात्र अतिक्रमणे काढण्यास धजावत नाही.