संजीव खाडे/ कोल्हापूर
शहरात कुत्र्यांना मारण्यासाठी चक्क ऍसिडचा वापर होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. टाकाळा आणि क्रांतिसिंह नाना पाटील नगरात ऍसिड टाकल्याने तीन कुत्र्यांचे शरीर भाजले असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. दरम्यान, पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेने या प्रकारावर चिंता व्यक्त केली असून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडींची दहशत आहे. नागरिकांवर हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यातून कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणीही होत आहे. पेटा कायद्यामुळे प्राणी हत्येवर प्रतिबंध आहेत. त्यामुळे महापालिका भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी निर्बीजिकरण, लसिकरण मोहीम राबवित आहे. पण कोरोनाच्या काळात या मोहिमेवर मर्यादा आल्या.
कुत्र्यांवर ऍसिड फेकण्याचे प्रकार
अंगावर येणाऱया, चावा घेणाऱया, पाठीमागे लागणाऱ्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांना काठी, दगड मारून हुसकविण्याचे प्रकार होत असतानाच धोकादायक कुत्र्यांना विष घालून मारले जात असल्याचीही चर्चा असते. पण आता ऍसिड टाकून कुत्र्यांना मारण्याचे, गंभीर जखमी करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने प्राणी विषयक संघटना चिंता व्यक्त करत आहेत.
दोन ठिकाणी गंभीर घटना
राजारामपुरी टाकाळा आणि क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे महिन्याभरात कुत्र्यांवर ज्वलनशील पदार्थ, द्रव टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. पीपल्स फॉर ऍनिमल संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साठे, सचिव आशिष खरबडे यांना नागरिकांनी फोन करून दोन कुत्रे गंभीर अवस्थेत विव्हळत असल्याची माहिती दिली. साठे आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी गेले असताना त्यांना कुत्र्यांची कातडी जळल्याचे आणि हाडे वितळल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने राजारामपुरीतील डॉ. कापडी यांच्याकडे गंभीर स्थितीतील कुत्र्यांवर उपचार सुरू केले. असाच प्रकार क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे घडला. तिन्ही कुत्रे कायमचे अधू झाले आहेत. पीपल्स फॉर ऍनिमलचे कार्यकर्ते या जखमी कुत्र्यांना सांभाळत आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात प्राणी छळ प्रतिबंध कायदा 1960 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुत्र्याला ठार मारल्याबद्दल एकावर गुन्हा
कृषि महाविद्यालय परिसरात खाऊ गल्लीजवळ एका कुत्र्याला लोखंडी गजाने डोक्यात प्रहार करून ठार मारल्याबद्दल एका खाद्यपदार्थ विक्रेत्यावर गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयात खटलाही सुरू होणार आहे. या गुन्ह्यात दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, त्यासाठी निर्बीजिकरण, लसिकरण सारख्या उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नागरिकांनी दबाव आणावा पण कुत्र्यांना ठार मारणे, त्यांच्यावर ऍसिडसारखे जीवघेणे पदार्थ टाकणे अमानवीय कृत्य आहे. -प्रशांत साठे, अध्यक्ष, पीपल्स फॉर अनिमल संस्था