युवकांचा मोठा सहभाग : जय श्रीरामचा जयघोष, ढोलताशे-डिजेच्या दणदणाटात शहर दुमदुमले
प्रतिनिधी /बेळगाव
रामनवमीनिमित्त रविवारी सायंकाळी श्रीरामसेना हिंदुस्थानच्यावतीने शहरात भव्य मिरवणूक (शोभायात्रा) काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोलताशे आणि डिजेच्या दणदणाटात निघालेल्या या मिरवणुकीने शहर दुमदुमले. प्रारंभी उपस्थित महिला आणि रामभक्तांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली.
कोरोनामुळे गत दोन वर्षे रामनवमीची मिरवणूक थांबली होती. मात्र यंदा हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत आणि युवकांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक राममूर्ती आणि हनुमान मूर्तीसह मिरवणूक चन्नम्मा सर्कल, कॉलेजरोड मार्गे मार्गस्थ झाली. मिरवणुकीदरम्यान महिलांनी आरती ओवाळून औक्षण केले.
मिरवणुकीत रामभक्त भगवे झेंडे घेऊन दाखल झाले होते. शिवाय फटाक्मयांची आतषबाजीदेखील करण्यात आली. मिरवणुकीतील ट्रक्टर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. मिरवणुकीतील श्रीराम मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले. दोन वर्षांत कोरोनामुळे न झालेल्या मिरवणुकीला युवकांचा अमाप प्रतिसाद मिळाला.