पालिकेचा आरोग्य विभाग लागलाय पेंगू
प्रतिनिधी/ सातारा
शहरात प्रामुख्याने करंजे, मंगळवार पेठ, सदरबाजार, गोडोली या भागात डेंग्यूची साथ सुरु आहे. अनेक रुग्ण खाजगी, सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचा फैलाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज पूर्णतः कोलमडले गेले आहे. कसलीही उपाययोजना होताना दिसत नाही. एवढेच काय तर असणाऱया सर्वच धुर फवारणी मशिन्स बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकच म्हणू लागलेत की खाजगी तरी धुर फवारणी मशिन्स द्या पण धुर फवारणी करा, अशी मागणी करत आहेत. याकडे पालिकेच्या पदाधिकाऱयांचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाची उघडझाप सुरु असल्याने अशा वातावरणात डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणावर होत असते. शहरात असे वातावरण असल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून गोडोली, करंजे, मंगळवार पेठ, सदरबाजार, गोडोली या भागात डेंग्यूची साथ उदभवली आहे. डेंग्यूची साथ उदभवल्याने अनेक जण सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी त्या परिसरात धुर फवारणी होणे गरजेचे आहे. त्याकरता सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेली दहाच्या दहा धुर फवारणी मशिन्स बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी जर धुर फवारणी आमच्या प्रभागात करा अशी विनंती केली असता सर्वच मशिन्स बंद आहेत, असे सांगण्यात येते. सातारा शहरात खाजगी मशिन्स कोणाकडे असतील तरीही उपलब्ध करुन द्या अशी विनंती केली जाते. परंतु त्या मशिन्स शहरात उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा पालिकेच्या पदाधिकाऱयांनी कर्मवीर कॉलनीची पाहणी करावी
पालिकेच्या पदाधिकाऱयांनी कर्मवीर कॉलनीत येवून पाहणी करावी. शहराच्या हद्दीत आम्ही आलो आहे. कसलीही सुविधा नाही. अस्वच्छता आहे. कोणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे. आम्ही कोणाकडे दाद मागायची.
संदीप पाटील कर्मवीर कॉलनी सातारा
हिवताप विभागाकडे कर्मचाऱयांची वाणवा
सातारा शहरातील जिल्हा हिवताप कार्यालयात असलेल्या काही कर्मचाऱयांच्या बदल्या इतर कार्यालयात झालेल्या आहेत. त्यामुळे मुळच्या तुटपुंज्या कर्मचाऱयांवर हे कार्यरत आहे. त्यातच ग्रामीण भागाकडे लक्ष द्या असेही सांगण्यात आल्याने पालिकेच्या हद्दीत पालिकाच डेंग्यूचे कामकाज करणार असल्याने उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे.