प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यामुळेच बुधवारी बेळगाव शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. शहराच्या सर्वच मुख्य मार्गांवर गर्दीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी कॅम्प येथील फिश मार्केट येथे बॅरिकेड्स लावण्यात आले. तर धर्मवीर संभाजी चौकातून किर्लोस्कर रोड येथे मोठय़ा वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. झालेल्या वाहतूक केंडीने वाहनचालकांचे मात्र हाल झाले.
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बुधवारी सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दी दिसून आली. गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार रोड, कॉलेज रोड, कलमठ रोड, काकतीवेस रोड या मुख्य मार्गांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी झाल्याने प्रचंड कोंडी झाली होती. गर्दीतून वाहने बाहेर काढेपर्यंत वाहनचालकांच्या नाकीनऊ येत होते.
फिश मार्केट येथून मार्गात केला बदल
काँग्रेस रोडवरून येणारी वाहने शहरात आल्याने गर्दी होत असल्याने रहदारी पोलिसांकडून मार्गात बदल करण्यात आला. फिश मार्केटनजीक बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. यामुळे वाहनचालकांना कॅम्पमधून गांधी पुतळय़ामार्गे चन्नम्मा चौकात यावे लागले. त्याचबरोबर किर्लोस्कर रोड कॉर्नरवरदेखील बॅरिकेड्स लावण्यात आले होते. केवळ दुचाकीलाच किर्लोस्कर रोड येथे प्रवेश दिला जात होता. चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर
शहरात मिळेल त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. अरुंद गल्ल्यांमध्ये चारचाकी वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. याचा फटका फिरते विपेते व व्यापाऱयांनाही बसला. यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत होती. बेशिस्त पार्किंगमुळे त्या गल्लीमध्ये येणारी वाहने अडकून पडली. बेशिस्त वाहने लावल्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. टोईंग करून या वाहनांना दंड करण्यात आला.