प्रतिनिधी/ कराड
जनशक्ती आघाडीने विषय समिती सभापतीपदी अनुभवी नगरसेवकांना संधी दिली आहे. शेवटच्या वर्षात शहरातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या तीन महिन्यात शहरात सुमारे 18 कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
येथील पालिकेत नवनिर्वाचित बांधकाम सभापती हणमंत पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नियोजन सभापती सुप्रिया खराडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार राजेंद्रसिंह यादव व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.
जनशक्ती आघाडीने गेल्या पाच वर्षात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. यास नागरिकांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळेच शहर सलग दोन वर्षे स्वच्छतेत अव्वल आले असून यावर्षी हॅटट्रीक साधणार आहोत. चोवीस तास पाणी योजना व वाढीव भागातील भुयारी गटर योजनाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सुमारे 85 कोटींचे रस्ते अनुदान मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कृष्णा नदी सौंदर्यीकरणाचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी शिल्पसृष्टीचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. गत निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थायी समितीवर निवडून आलेले लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, सुधीर एकांडे यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांची अनुपस्थिती होती.