उकाडय़ाने नागरिक हैराण, हेस्कॉमचा गलथान कारभार सुरूच
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर व परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेळगाववासीय हैरण झाले आहेत. उन्हाळाच्या दिवसात लाईट नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता दिवसातून सात ते आठ वेळा वीजपुरवठा ठप्प केला जात असल्याने नागरिकांमधून हेस्कॉमच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
एरवी दुरुस्तीच्या नावाखाली हेस्कॉमकडून या ना त्या भागातील वीजपुरवठा ठप्प असतो. परंतु सध्या कुठेही दुरुस्तीचे काम नसताना वीजपुरवठा बंद केला जात आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच आहेत. परंतु लाईट नसल्याने हे नागरिक उकाडय़ाने हैराण होत आहेत. अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाल्यानेच असे प्रकार घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. कोरोनाचे कारण दाखवत अधिकारी व कर्मचारीही चालढकल करीत असल्याने विजेचे बील भरूनही खंडित वीजपुरवठा होत आहे.
कोरोना रुग्णांना बसतोय फटका
बेळगाव शहरासह तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे काही प्रमाणात आहेत अशांवर रुग्णांच्या घरीच उपचार सुरू आहेत. परंतु या रुग्णांना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णांच्या उपचारामध्येही व्यत्यय येत आहे. त्यामुळे निदान उपचारासाठीतरी सुरळीत वीजपुरवठा करा, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे.
वर्क फ्रॉम होम वाल्यांचे वाजले बारा
कंपन्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याने कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. वर्क फ्रॉम होम करताना नेटवर्क व लाईट सुरळीत असणे आवश्यक आहे. परंतु विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱयांना त्याचा फटका बसत आहे. जोवर लाईट येत नाही तोवर त्यांना काम थांबवावे लागत आहे. लाईट गेल्यानंतर हेस्कॉम कार्यालयात फोन केल्यानंतरही समर्पक उत्तरे मिळत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.