झाडे, विद्युतखांब कोसळून पुन्हा नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन दिवसांपासून शहरात हुलकावणी दिलेल्या पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱयासह विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पावसाने झोडपले. यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली. तसेच विद्युततारांवर झाडांच्या फांद्यादेखील कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागामध्येही जोरदार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ पावसाने शहरासह उपनगराला झोडपले. या दमदार पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली.
सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. पाऊस होईल अशी अपेक्षा होती. दुपारीच पावसाचे आगमन झाले. शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारहाटसाठी आलेल्या अनेकांना पावसामुळे आडोसा शोधावा लागला. खरेदी करताना साऱयांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे दुचाकीस्वारांना आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करून आडोसा घ्यावा लागला. तर काहींना भिजतच घर गाठावे लागले.
वळिवाच्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्याच्या बाजूला पाणी साचून होते. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील अरगन तलावाजवळ झाडाची फांदी कोसळली. सुदैवानेच यावेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. याचबरोबर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या. पावसाबरोबरच जोरदार वारा वाहत होता.
मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, रविवार पेठ, कलमठ रोड या परिसरात पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत होते. गटारीमध्ये अनेक ठिकाणी कचरा साचल्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे त्या घाण आणि दुर्गंधयुक्त पाण्यातून पादचाऱयांना वाट काढावी लागत होती. गारादेखील मोठय़ा प्रमाणात कोसळल्या.
उपनगरांमध्ये पाणीच पाणी
शहराबरोबरच उपनगरांनाही वळिवाने झोडपले. यामुळे सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी गटारींमधील पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत होते. वडगाव, आनंदनगर, केशवनगर परिसरात डेनेजची समस्या गंभीर बनल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहत होते.
ग्रामीण भागात वळिवाचा दणका
शनिवारी हलगा, तारिहाळ, बस्तवाड, धामणे, येळ्ळूर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे चार झाडे कोसळली. याचबरोबर विद्युतखांबही कोसळले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाहीत. झाडे कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर काही नागरिकांनी मशीनच्या साहाय्याने पडलेली झाडे कापून रस्त्याच्या बाजूला केली आणि रस्ता वाहतुकीस खुला केला.