प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात लसीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी शहरी आणि निमशहरी भागात वॉर्डनिहाय लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांना दिल्या आहेत.
गौडा यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभावीपणे लसीकरण करण्यासाठी शहरी आणि निमशहरी भागातील नागरिकांसाठी त्या भागातील नगरपालिका व नगरपरिषदेकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने नगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड लस देय लाभार्थींची वॉर्डनिहाय यादी तयार करण्यात यावी, लस देय लाभार्थींचे लसीकरणाचे वॉर्डनिहाय कृतिनियोजन तालुका आरोग्यअधिकारी यांच्यासोबत करावे, कार्यक्षेत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या लसीकरण सत्रासाठी ठिकाणचे नियोजन करणे तसेच त्या ठिकाणी व्हेरिफायर, ऑपरेटर व इतर आवश्यक मनुष्यबळ देवून लसीकरणाचे कामकाज वाढवणे, वॉर्डनिहाय लसीकरण केंद्रावर स्वयंसेवकांची नेमणूक व कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात यावी, कोविड लसीकरण केंद्राबाबत व मोहिमेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात यावी, तर आरोग्य विभागाकडून लसीकरण सत्राच्या ठिकाणी लसीकरण टीचे नियोजन करणे, त्यात डॉक्टर, व्हॅक्सीनेटर यांचा समावेश असावा, आवश्यकतेनुसार ग्रामीण कार्यक्षेत्रातील व्हॅक्सीनेटर लसीकरणासाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत, लसीकरणासाठी आवश्यक लसीची मागणी करावी, अशा त्यांनी सुचना केल्या आहेत.