प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेत शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध प्रशासकीय कार्यालयाच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे. बेळगाव जिल्हा शिक्षण कार्यालयाबरोबरच बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी विभागदेखील कार्यरत असून सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य काळजी घेत कामकाज पार पाडले जात आहे. कार्यालयात 17 कर्मचारी सेवा बजावत असून 2 कर्मचाऱयांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे आदेशाप्रमाणे 33 टक्के कर्मचाऱयांच्या माध्यमातून सध्या कार्यप्रणाली अवलंबली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र सरकारी कर्मचारी म्हणून बेळगाव शहर शिक्षण विभागाचे कामकाज 22 मार्च पासून सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱयांना सेवेची संधी मिळावी यासाठी सोयीनुसार डय़ुटी लावण्यात आली असून एक दिवसाआड तसेच कामकाजाचे स्वरुप विचारत घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यालयात कार्यरत काही महिला कर्मचाऱयांना घरापासून कार्यालयीन स्थळी पोहोचण्यात प्रवासाची समस्या असल्याने याचा विचार करून कामकाज ठरविण्यात आले आहे.
कार्यालयाचा एक दरवाजा बंद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यामुळे बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी विभागाने कार्यालयाचा मुख्य एक दरवाजा बंद केला आहे. तर कार्यालयात थेट प्रवेश नको यासाठी खुर्ची लावून दरवाजा अडविण्यात आला आहे. तर कार्यरत शिपाई कर्मचाऱयांकडून संबंधितांची चौकशी करूनच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाची संकटछाया दाट होत असताना सरकारी काम म्हणून सेवा तर बजावायची आहेच. मात्र आपल्या पातळीवर सुरक्षिततेची काळजी म्हणून मास्क व सॅनिटायझर्सचा वापर देखील कटाक्षाने केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे..