दीर्घकाळानंतर गणेश मंदिरांमध्ये भाविकांची लोटली गर्दी : कोरोना नियमांच्या पालनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
समस्त भक्तजणांचे आराध्यदैवत असणाऱया गणेशाची जयंती शहर परिसरात उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दीर्घकाळानंतर गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पहायला मिळाली. कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून मंदिरे बंद होती. त्यामुळे गणेश जयंतीच्या निमित्ताने भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन कोरोना पूर्णपणे हद्दपार होवो, असे साकडेही घातले.
सालाबादप्रमाणे बाजार गल्ली-वडगाव येथील श्री मारुती मंदिर व गणेश मंदिरामध्ये गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता श्री प्रतिमेला पंचाभिषेक, महारुद्राभिषेक व कुंकुमार्चन विधी पुरोहित बद्रिनाथ कुलकर्णी यांनी केला. सकाळी 9 वाजता सांगता पूजन करून पाच जोडप्यांच्या हस्ते पुरोहित सागर यांनी गणहोम केला. दुपारी 12 वाजता सुवासिनींच्या हस्ते आरती व पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्व भाविकांना तीर्थप्रसाद देऊन कळसारोहणाची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. रात्री भजन होऊन सांगता झाली.
स्वयंभू गणेश मंदिर-टिळकवाडी
टिळकवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात सकाळी 6 वाजता काकडारती, 7 वाजता महाअभिषेक भक्तांच्या हस्ते करण्यात आला. 10 ते 11 यावेळेत महागणहोम झाला. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव व मंत्रपुष्पांजली झाली. यावेळी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सायंकाळी महिला भजनी मंडळ व सांप्रदायिक भजनी मंडळ-हंगरगे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दामोदर भोसले, शंकर जाधव, सुरेश पाटील, रामू जाधव, सुधीर घोडके, मारुती कदम, रमेश गवळी, रामा जोशीलकर, कृष्णा गवळी, विलास कुलकर्णी, देशपांडे भटजी, नेमाणी हुंदरे यांनी विशेष प्रयत्न केले.
टिळकवाडी, महात्मा गांधी-महषी रोडवरील श्री सिद्धिविनायक देवस्थानमध्ये मोठय़ा उत्साहाने भाविकांच्या उपस्थितीत गणेश जयंती साजरी करण्यात आली. यावेळी देवस्थान समिती सदस्य व सिद्धी महिला मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव करण्यात आला. चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक विधी झाले. या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. गणेश जयंतीच्या निमित्ताने भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत श्रीमूर्तींचे दर्शन घेतले.
शास्त्रीनगर तिसरा क्रॉस गणपती मंदिर
शास्त्रीनगर, तिसरा क्रॉस येथील गणपती मंदिरामध्ये सकाळी अथर्वशीर्ष आवर्तन होऊन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर अलंकारांसह श्रींची पूजा करण्यात आली. दुपारी 12 च्या दरम्यान गणपती जन्मोत्सव करण्यात आला. कोविड-19 च्या नियमामुळे भाविकांना सामाजिक अंतर पाळून लाडूचा प्रसाद देण्यात आला.
सिद्धिविनायक मंडळ-शहापूर
सालाबादप्रमाणे सिद्धिविनायक मंडळ, शहापूर येथे गणेश जयंतीनिमित्त सकाळी 8 ते 10 वा. दुग्धाभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव झाला. पूजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. मांगले परिवार यांनी यजमानपद सांभाळले. सी. एस. बेंबळगी व गौतम फॅब्रिक्सतर्फे प्रसाद वाटप केला.
कचेरी गल्ली-शहापूर, कपिलेश्वर रोड-शहापूर येथील गणेश मंदिरांमध्ये सकाळी अभिषेक आणि आरती झाली. कपिलेश्वर रोड मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता गणहोम आणि आरती झाली.
गणाचारी गल्ली (बकरी मंडई)-गणेश मंदिर
बकरी मंडई येथील हिंदू खाटीक समाजातर्फे गणेश जयंतीनिमित्त सकाळी 8 वाजता अभिषेक करण्यात आला. 11 वाजता जन्मोत्सव व महाआरती झाली. यावेळी अध्यक्ष उदय घोडके, राजू कांबळे, डॉ. चंद्रकांत बेळगावकर, धनंजय घोडके, दीपक गायकवाड, अशोक कांबळे, सुधीर घोडके, दीपक शेटके, आकाश शारबिदे व समाजबांधव उपस्थित होते. पतंगे गुरुजींनी पौरोहित्य केले.