चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना, येशू जन्माचे लक्षवेधी देखावे
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रभू येशू यांचा जन्म दिवस म्हणजे नाताळ. हा सण ख्रिस्ती बांधवांनी मोठय़ा उत्साहात व आनंदपूर्ण वातावरणात साजरा केला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरातील चर्चेस गर्दीने फुलली होती. नागरिकांनी सामूहिक प्रार्थना करत येशूचा जन्मोत्सव साजरा केला. या निमित्त करण्यात आलेले येशू जन्माचे देखावे लक्षवेधी ठरले.
रात्री ख्रिस्ती बांधवांनी विशेष प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी केली होती. नाताळासाठी चर्चेसवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथे प्रमुख धर्मगुरू फादर डेरेक फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थना झाली. मध्यरात्री 12 वा. बाळ येशूची मूर्ती चर्चमध्ये आणून सजविण्यात आलेल्या गोठय़ामध्ये (ख्रिसमस क्रिप) आणून ठेवण्यात आली. घंटेच्या निनादात येशू जन्माचा सोहळा पार पडला.
संदेश देताना फादर डेरेक फर्नांडिस म्हणाले प्रभू येशूप्रमाणे अनेक मुलांनी जीवनामध्ये बरेच काही गमावले आहे. अशा माता आहेत ज्या अन्न व निवाऱयासाठी मुलांना घेऊन फिरत आहेत. त्यांच्यासाठी तात्पुरता उपाय शोधून उपयोग नाही तर समाजाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून त्यांची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.
केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे तर इतर बांधवांनीही एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस केक व इतर फराळांचा आस्वाद घेतला. ख्रिश्चन तसेच मेथॉडिस्ट चर्चमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कोरोना नियमावलीचे पालन करत नाताळ साजरा करण्यात आला.
नाताळासाठी अनेक चर्चबाहेर तसेच शाळांमध्ये आकर्षक असे देखावे करण्यात आले होते. सेंट द जॉन बॅपिस्ट, वैभवनगर येथील सेंट जोसेफ चर्च, कॅम्प येथील सेंट ऍन्थोनी, इमॅक्मयूलेट कन्सप्शन चर्च, शहापूर येथील माऊंट कारमेल चर्च, कोर्ट कंपाऊंड येथील मेथॉडिस्ट चर्च, सेंट मेरी चर्च यासह शहरातील इतर चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते.