वडगाव, शहापूरमध्ये जोर अधिक
प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा पावसाने शहरात हजेरी लावली. बेळगाव शहरासह उपनगर व तालुक्मयात दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. वडगाव, शहापूर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सकाळी ऊन व दुपारनंतर पाऊस असे वातावरण बेळगावमध्ये पाहायला मिळाले. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. आधीच लॉकडाऊनमुळे सकाळपासून शांतता होती. त्यातच पाऊस आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला.
रविवारी सकाळी कडक ऊन होते. यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी लगबग दिसून आली. लॉकडाऊन असल्याने शेतामध्ये काम करण्यासाठी नागरिकांची वर्दळ दिसत होती. दुपारी मात्र वातारणात बदल होऊन ढग दाटून आले. काळे ढग येताच शेतांमधून घराकडे येण्यासाठीची धांदल सुरू झाली. दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाली. बेळगाव शहरात दुपारपासून रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.
वडगावमध्ये दमदार पाऊस रविवारी दुपारी वडगाव-खासबाग परिसरात दमदार पाऊस झाला. पावसाचा जोर अधिक असल्याने गटारी भरून पाणी रस्त्यांवरून वाहत होते. यामुळे गटारींमधील कचरा रस्त्यावर येऊन पडला होता. येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, विष्णू गल्ली, वझे गल्ली, पाटील गल्ली, कारभार गल्ली, बाजार गल्ली या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते.