आठ जणांवर गुन्हा दाखल तर त्यातील पाच जणांना अटक
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात तीन ठिकाणी जुगार चालत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या सुचनेनुसार दोन ठिकाणी छापे टाकून आठ जणांवर गुन्हे दाखल केले तर त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना खास खबऱयांमार्फत गुरुवार परज आणि कोडोली ग्रामपंचायतीच्या समोर जुगार चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पथकाने गुरुवार परज येथे छापा टाकला असता तेथे जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने शरद श्यामराव साळुंखे(वय 54, साई कॉलनी शाहुनगर), अस्लम ईस्माईल मुल्ला(वय 52, रा. नालबंदवाडा गुरुवार परज) यांना अटक करण्यात आली तर यासिन शेख (रा. शनिवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. त्याच्याकडून 1130 रुपयांची रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आही. तसेच कोडोली येथील ग्रामपंचायतीच्या कमानीसमोर फळाच्या गाडय़ाच्या आडोशाला जुगार अडयावर छापा मारला असता त्यामध्ये विकास राव काकडे(वय 59, रा. तुकारामनगर अमरलक्ष्मी), पांडुरंग रवींद्र शिंदे(वय 32, रा. लक्ष्मीनगर कोडोली) यांना अटक केली तर यासिन इकबाल शेख(रा. शनिवार पेठ) हा फरार असून त्याच्यासह सलीम हसन मुलाणी(रा. कोडोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सेव्हन स्टार इमारतीच्या पाठीमागे जुगार अडय़ावर छापा टाकून मनिब राजकिशोर शर्मा(वय 37, रा. सय्यद कॉलनी करंजे पेठ), यासिन इकबाल शेख(रा. शनिवार पेठ) हे दोघे आढळून आले त्यांच्याकडून 950 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. मनिब यास अटक केली तर यासिन हा फरार झाला आहे. सातारा शहर पोलीस याचा तपास करत आहेत.