प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलीसांनी सोमवारी दोन मोटार सायकल चोरटय़ांना शिखर शिंगणापूर येथून तर एका चोरटय़ाला सातारा शहरातून जेरबंद केले आहे. यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात 6 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ते पोलीसांनी उघडकीस आणले असून एकून 2 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटार सायकल चोरणाऱया चोरटय़ांचा शोध घेवून त्यांना प्रतिबंध करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिल्या. या सुचनेनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस.कदम व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले. यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाला मोटार सायकल चोरीतील आरोपी शिखर शिंगणापूर येथे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी पोलीसांनी दोन संशयित सोमनाथ साहेबराव जाधव (वय 25 रा. शिंगणापूर ता. माण), स्वप्निल संजय जाधव (वय 26 रा. शिंगणापूर ता. माण) यांना ताब्यात घेतले. यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सातारा शहरातील एका साथीदार संशयित युवराज अकोबा निकम (वय 53 रा. सदरबझार) याच्या मदतीने मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. या तिघांकडून 7 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील सहा मोटार सायकल चोरीचे गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ते गुन्हे उघडकीस आले असून पोलीसांनी एकून 2 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलीस हवालदार मेचकर, महिला पोलीस हवालदार भवारी, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, पंकज ढाणे, सुजीत भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, गणेश घाडगे, विनायक मानवी यांनी सहभाग घेतला.