प्रतिनिधी/ सातारा
ऍड. राम मोहन खारकर (वय 37) यांच्यावर शाहूनगर चौकात शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला. या अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी लक्ष घातले आहे. या प्रकरणाचा तपास त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे वर्ग केला आहे. पोनि निंबाळकर सोमवारी स्पेशल टीम घेऊन पुण्याला रवाना झाले आहेत. अद्याप कोणतेही धागे-दोरे हाती आले नसून जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.
ऍड. राम खारकर यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ते पुण्यात उपचार घेत आहेत. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्याकडे तपास वर्ग केला आहे. यामुळे सोमवारी पोनि निंबाळकर पुण्याला स्पेशल टीम घेऊन पोहचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवस उलटूनही कोणतेही धागे-दोरे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जिल्हा बार असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष ऍड. सुखदेव पाटील व वकीलांच्या वतीने करण्यात आली आहे. तोपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले.